best news portal development company in india

बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”

SHARE:

बीडमधील स्थिती सुधारावी म्हणून शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला. या फोनवरील संवादात सकारात्मक चर्चा झाली.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद अवघ्या राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय होऊन राज्य शांत झालं पाहिजे, अशी सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. दिल्ली येथे पार पडणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा स्वागताध्यक्ष म्हणून मराठी साहित्यकांशी संवाद साधताना शरद पवारांनी ही माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, “गेले काही दिवस महाराष्ट्रात अस्वस्थ चित्र दिसतंय. माझे दिवसाचे ६-७ तास बीड कसं नॉर्मल करता येईल? परभणीचा विषय कसा सोडवता येईल? आणखीन कुठे काय करता येईल याबद्दल संवाद सुरू आहे. जिवाभावाने एकत्र राहणारी माणसं आज एकमेकांच्या शत्रुप्रमाणे वागत आहेत. काही गावांमध्ये एवढे दहशतीचं, भीतीचं वातावरण आहे. आजच मी इथे येण्याआधी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चाही झाली. राजकारणात काही मतभेद असतील-नसतील पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही. काही झालं तरी ऐक्य राखायचं. लोकांच्या मनातला विद्वेष जाईल कसा याची काळजी घ्यायची आणि ते काम करून एकटा-दुकटा करू शकत नाहीत. मुख्यमंत्री एकटे करू शकत नाही. सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले तुमच्यासारखे जाणकार या प्रश्नावर एका विचाराने उभे राहतील आणि आपला विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची काळजी घेतील त्यावेळेस मला खात्री आहे महाराष्ट्र हा शांत होईल.”

“आज महाराष्ट्र पूर्वस्थितीवर आणायचं अशी एक आव्हानाची स्थिती आपल्या सगळ्यासमोर आहे आणि ह्या कामांमध्ये साहित्यिकांची लेखणी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांची साथ संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मिळेल”, अशी आशा शरद पवारांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय?

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आपल्या सर्वांना मिळूनच हा भाग शांत करावा लागेल. हा भाग शांत होण्याकरता सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. जिथे दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे.”

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india