इंग्रज मागावर होते. डोक्यावर हजार रुपयांचं बक्षीस होतं. पण त्याचं लक्ष्य एकच, इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणं.त्यांनी धडपड करुन गोव्याहून हत्यारं आणली, धुळ्यातला सरकारी खजिना लुटला, पोलीस चौकीतून बंदूका लुटल्या, बेसावध असताना अटक झाली तर तुरुंग फोडून पोबारा केला.अशा किती धाडसी मोहिमांची यादी सांगावी? त्यांच्या बंदूक पकडण्याच्या कृतीमागे इंग्रजांना पिटाळून लावणं हे उद्दिष्ट्य तर होतंच; पण त्यासोबतच होतं ते समताधिष्ठित समाजनिर्मितीचं स्वप्न.कष्टकऱ्यांचं, शोषित-वंचितांचं राज्य यावं, हेच स्वप्न उराशी घेऊन, अगदी स्वातंत्र्यानंतरही ते लोकांच्या प्रश्नांसाठी अविरत झटत राहिले.नागनाथ अण्णा नायकवडी नावाच्या वादळाची ही गोष्ट. आज, 15 जुलै त्यांचा जन्मदिन!
आणि नागनाथ अण्णांनी तुरुंग फोडला..
29 जुलै 1944 ची ती रात्र. कुणी दगाबाजी केली माहिती नाही. पण, रात्रीच्या एका बेसावध क्षणी इंग्रजांनी भूमिगत नागनाथअण्णांना पकडलं. त्याआधी दोन ते तीन वर्षे नागनाथअण्णा इंग्रजांना चकवा देत त्यांना जेरीस आणत होते.क्रांतिकारक चळवळी मोडून काढण्यात प्रसिद्ध असलेला इंग्रज अधिकारी मूर गिल्बर्टची खास नेमणूक सातारा-सांगली भागातील क्रांतीकारक चळवळ मोडून काढण्यासाठी झाली होती.वाळवाभर बातमी पसरली. नागनाथ पकडला गेला. त्यांना इस्लामपूर तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. पण, नागनाथअण्णांचा इतिहास पाहता त्यांना त्यापेक्षा मजबूत नि सुरक्षित तुरुंगात ठेवणंच इंग्रजांना योग्य वाटलं.सातारा जेलमध्ये आणून फक्त तीन दिवस झाले होते. अंघोळीसाठी सर्व कैद्यांना मोकळं करण्यात आलं. ठरल्याप्रमाणे नागनाथअण्णा त्यांच्या तीन साथीदारांसह तुरुंगाच्या त्या भल्या-उंच भिंतीजवळ गेले. दोघांच्या खांद्यावर तिसरा नि तिसऱ्याच्या खांद्यावर नागनाथअण्णा…कुणाला काही संशय यायच्या आतच नागनाथअण्णा भिंतीवरुन उडी मारुन इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन कधीचेच पसार झाले होते.सायरन वाजला होता. नागनाथ अण्णांना पकडण्यासाठी पोलीस पुन्हा धावाधाव करु लागले होते. मात्र अण्णा, जमिनीचं पोट फाडून एखाद्यानं गायब व्हावं, तसं कधीचेच पुन्हा भूमिगत झाले होते.
क्रांतीसिंह नाना पाटलांचा पठ्ठ्या
15 जुलै 1922 साली एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या नागनाथ अण्णांची जडणघडण क्रांतीसिंह नाना पाटलांच्या तालमीत झाली होती. नाना पाटलांचं वाळव्याला सतत जाणं-येणं होतं.वाळव्याच्या माळावरच्या मारुती देवळाच्या पटांगणात नाना पाटील यायचे. शड्डू मारुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा द्यायचे.ही घोषणा ऐकून जो मुलगा सर्वांत आधी धावत यायचा त्याच्या हातात तिरंगा द्यायचे नि मग त्याच्या नेतृत्वात निघायची ती स्वातंत्र्यासाठीची प्रभात फेरी. वाळव्यातल्या फेरीचा हा मान नागनाथअण्णांनी चुकवला, असं कधीच झालं नाही.त्यामुळे, पुढे जाऊन नागनाथअण्णा नाना पाटलांच्या प्रतिसरकारमधील एक महत्त्वाचे शिलेदार झाले, यात काही नवल नव्हतं.अण्णांनी वाळव्यातील तरुणांची मोट बांधली. त्यांना सशस्त्र क्रांतीसाठी तयार केलं.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी घरादाराच्या त्याग केला. वडिलांची इच्छा होती, पोरानं शिकून-सवरून सरकारी नोकरी करावी, खाऊन-पिऊन पैलवान व्हावं, कुस्त्या माराव्यात. शांततेत समाधानानं आयुष्य काढावं.नागनाथ अण्णांनी त्यातली एकच गोष्ट ऐकली. त्यांनी आयुष्यभर कुस्ती खेळली खरी, पण मैदान निवडलं ते वेगळंच. त्यांनी जीवावर उदार होऊन सतत असे डाव टाकले, की इंग्रजांना आता त्यांचा वीट आला होता.खरं तर, या सगळ्या क्रांतिकार्याचा त्रास अगदी घरातल्यांनाही भोगावा लागला. अगदी, आई-वडिलांनाही तुरुंगात जावं लागलं.पण, इंग्रज जाऊन देशातील कष्टकऱ्यांचं, श्रमणाऱ्यांचं राज्य यावं, यासाठी अण्णा भारावलेले होते.
सरकारी खजिन्याची लूट ते सोनवड्याची लढाई
वयाच्या विशीतले अण्णा 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनावेळी मुंबईला गेले. तिथल्या वातावरणाने ते प्रचंड प्रेरणा घेऊन वाळव्याला परत आले.पण, आता महात्मा गांधींच्या सत्याग्रही अहिंसक मार्गाने जावं, की सुभाषचंद्र बोसांच्या सशस्त्र मार्गाने जावं, याबद्दलचं त्यांच्या मनातलं द्वंद्व अधिकच गहिरं झालं होतं.कारण, ‘चले जाव’ म्हणत इस्लामपूरच्या मामलेदार कचेरीवर काढलेल्या मोर्चावेळी इंग्रजांनी झाडलेल्या गोळ्यांनी साऱ्या गर्दीची पांगापाग होताना अण्णांनी पाहिलं.मनानं अखेरचा कौल दिला. इंग्रजांना ‘जशास तसं’ उत्तर देण्याचं धैर्य आता त्यांच्या मनात एकवटलेलं होतं.एकीकडे, क्रांतीसिंह नाना पाटलांची सावली डोक्यावर होती तर दुसरीकडे, बाबूजी पाटणकर, जी. डी. बापू लाड, किसनराव अहिर, वसंतदादा पाटील यांसारख्या मित्रांची साथ होती.नागनाथअण्णांनी सशस्त्र लढा उभारण्यासाठीचा खटाटोप सुरू केला. माहिती काढून लपत-छपत गोव्याहून हत्यारं आणली आणि तिथून सुरू झाली सांगली-सातारा भागातील सशस्त्र क्रांती.1942 ते 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत, सलग पाच वर्षे अण्णा इंग्रजांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरले होते.याच काळात त्यांनी क्रांतिकार्यासाठी स्पेशल ट्रेनची लूट केली. धुळ्यातला सरकारी खजिना लुटला.इंग्रजांचा ससेमिरा कायम असतानाही हा खजिना पोलिसांना गुंगारा देत मोठ्या शिताफीनं सांगलीला आणला.
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








