best news portal development company in india

‘मनसेशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण राज…’ उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

SHARE:

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ मतभेद विसरुन एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आज (19 जून) साजरा होत आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यापासून शिवसेना वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम होतात. शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापनदिन षणमुखानंद हॉलमध्ये होणार आहे तर वरळीमध्ये शिंदे गटाचा वर्धापनदिन कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य भाषण आहे. या भाषणात दोन्ही नेते काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

उद्धव-राज एकत्र येणार का?

शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षाच्या युतीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ मतभेद विसरुन एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे याबाबत काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे जवळचे नेते विनायक राऊत यांनीमोठं वक्तव्य केलं आहे. 

मनसे संदर्भातील युती संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत. पण ही युती करण्यासाठी दोन्ही बाजूने सकारात्मकता पाहिजे, असं राऊत यांनी सांगितलं.  राज ठाकरे याबाबत गांभीर्याने विचार करतील अशी अपेक्षा आहे. मनसेकडून जे बोलणारे आहेत त्यांची त्यांचा पक्षात अधिकार काय? असा सवाल राऊत यांनी केला जे काही बोलायचं आहे तो राज ठाकरे यांचा अधिकार आहे. जे काल-परवापर्यंत टूरटुर करत आहेत त्यांचा तो अधिकार नाही, असंही त्यांनी सुनावलं. 

राज आणि उद्धव यांनी एकत्र बसून…

कोणत्याही शंका कुशंका असतील तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून मत मांडावे. आमच्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे पण आमच्याकडून कोणी काहीही बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंसोबत भेट झाली. आम्ही त्यावर शंका उपस्थित केली नाही. ते विकासाच्या मुद्द्यावर भेटले असतील महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा विचार केला तर राज ठाकरे नक्कीच उद्धव साहेबांसोबत येतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेवर कठीण प्रसंग हा पहिल्यांदाच आलेला नाही यापूर्वी देखील असे प्रसंग ओढावले आहेत. यापूर्वी देखील आम्हाला छगन भुजबळ नारायण राणे गणेश नाईक सोडून गेले. त्यांनी देखील शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिवसेनेचा संघर्षाचा पिंड आहे. शिवसेनेला गळती लागलेली नाही. काही भाडोत्री दलाल राजकारणात तयार झाले आहेत  त्या दलालांनी काही गिऱ्हाईकांना पटवण्याचा प्रयत्न केला आहे. काही गिऱ्हाईक पटले, पण त्यांच्या भरवश्यावर शिवसेना कधीच नव्हती. काहीही असलं तरी आम्ही मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये पहिला क्रमांक पटकावू असं राऊत यांनी सांगितलं. 

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india