best news portal development company in india

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 32 जण जखमी झाल्याची CM फडणवीसांची माहिती

SHARE:

मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलीय.

पुणे जिल्ह्यात रविवारी (15 जून) मोठा दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवर पूल कोसळला. या दुर्घटनेमध्ये 25 ते 30 जण वाहून गेल्याची माहिती समोर आलीय. मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरातील ही घटना आहे. तळेगाव दाभाडे परिसरातील कुंडमळा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीवरील कोसळलेला पूल अतिशय जुना होता. ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा पुलावर कित्येक पर्यटक उपस्थित होते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, आपत्ती निवारण कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक रघुवीर शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळेस 100 हून अधिक पर्यटक पुलावर उपस्थित होते. यापैकी 20 ते 25 लोकांना स्थानिकांनी वाचवले. चार ते पाच लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आलीय. याव्यतिरिक्त पूल कोसळल्यानंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हायड्रा कॅन देखील मागवण्यात आले. वाचलेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

मागील दोन दिवसांपासून मावळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. यादरम्यानच ही दुर्घटना घडलीय. नदीमध्ये वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफच्या दोन टीम देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

CM फडणवीस यांनी ‘X’वर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे”.

काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदतकार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत: CM देवेंद्र फडणवीस

32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत: CM देवेंद्र फडणवीस

राशप खासदार सुप्रिया सुळे यांनीही इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केलाय. सुप्रिया सुळेंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटलंय की,” पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरिक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरिकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे”.

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india