दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या विमानात 181 लोक होते.
दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या अपघातात 62 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 37 महिला आणि 25 पुरुषांचा समावेश आहे.लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरून भिंतीवर आदळल्यानं अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
योनहाप या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानाची पक्षांशी टक्कर झाल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता आहे.विमानतळाच्या अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने विमानाच्या मागील भागातून प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.
विमानातील 181 लोकांमध्ये 175 प्रवासी आणि 6 विमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जेजू एअरचं हे विमान थायलंडमधील बँकॉकहून परत येत होते आणि लँडिंग करत असताना हा अपघात झाला.योनहापच्या म्हणण्यांनुसार, अपघातानंतर बचाव मोहीम सुरू आहे.
यात आतापर्यंत दोन जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. यात एका प्रवाशाचा आणि एका विमान कर्मचाऱ्याचा समावेश आहे.सत्यता न तपासलेल्या सोशल मीडियावरील फुटेजमध्ये विमान धावपट्टीवरून घसरून भिंतीवर आदळताना दिसत आहे.
यानंतर विमानाच्या काही भागाला आग लागते. इतर फुटेजमध्ये काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात उठताना दिसत आहेत.80 अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि 30 अग्निशमन ट्रकच्या सहाय्याने अपघातग्रस्तांना वाचवण्याचं काम सुरू आहे, असंही दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीने नमूद केलं.अपघात झालं ते मुआन ठिकाण दक्षिण कोरियाची राजधानी सोलच्या दक्षिणेला जवळपास 288 किमी अंतरावर आहे.
दक्षिण कोरियाचा विमान वाहतूक उद्योग त्याच्या सुरक्षित विमान प्रवासासाठी ओळखला जातो. असं असताना हा अपघात घडला आहे.हा अपघात जेजू एअरच्या इतिहासातील पहिला जीवघेणा अपघात आहे. जेजू एअरची 2005 मध्ये स्थापन झाली. ही कंपनी दक्षिण कोरियाच्या कमी दराने विमान प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या सर्वात मोठ्या एअरलाइन्सपैकी एक आहे.
कझाकिस्तानमधील विमान अपघातात 38 प्रवाशांचा मृत्यू
दरम्यान, ख्रिसमसच्या दिवशी कझकिस्तानमध्ये 67 प्रवासी असलेल्या एका विमानाचा अपघात झाला होता. यात 38 जणांचा मृत्यू झाला. झालेल्या या दुर्घटनेबाबत पुतिन म्हणाले की, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणा युक्रेनचे ड्रोन परतवून लावत असताना ही ‘दुःखद घटना’ घडली.हे विमान चेचन्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर रशियाच्या हवाई संरक्षण दलानं हल्ला केल्याचं सांगण्यात येत होतं.
त्यामुळं विमानाला कॅस्पिनयन सागराकडं वळावं लागलं होतं. त्यानंतर या विमानाला कझाकिस्तानमध्ये अपघात झाला.25 डिसेंबरला एम्ब्रेयर विमानाला अकताऊ विमानतळावरील धावपट्टीपासून 3 किमी अंतरावर कोसळून आग लागली होती.या विमान अपघातानंतर अझरबैजान एअरलाइन्सनं रशियाच्या 7 शहरांची उड्डाणं स्थगित केली आहेत.
युक्रेनच्या गुप्तचर संचालनालयाच्या प्रमुखानेही या विमान अपघातासाठी रशियाला जबाबदार धरलं आहे.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या हवाई हद्दीत एक व्यावसायिक विमान पाडल्याच्या घटनेसाठी शेजारी देश अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांची माफी मागितली आहे.
(महाराष्ट्र लाईव्ह 24 कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








